सातारा : जिल्ह्यातील मे ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण ७१४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने या कार्यक्रमात बदल केला असून, मे ते जुलै या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचीच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील कोरेगाव, सातारारोड (ता. कोरेगाव) व किरोंडे (ता. वाई) या तीनच ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान, १६९ ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात कोणताही बदल झालेला नाही. सातारा जिल्ह्यातील ७१४ ग्रामपंचायतींपैकी मे ते जुलै २०१५ या कालावधीत कोरेगाव, सातारारोड व किरोंडे या तीन ग्रामपंचायतींची मुदत संपत असून, उर्वरित ७११ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्ट ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत संपत आहे. त्यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमातून जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायती वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ३० मार्चला संबंधित ठिकाणी नोटीस प्रसिद्ध केली जाईल. सार्वजनिक सुटीचा दिवस वगळून ३१ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दिले व स्वीकारले जातील. ८ एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज १० एप्रिलला दुपारी तीनपर्यंत मागे घेता येतील. त्याचदिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. २२ एप्रिलला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होईल. २३ एप्रिलला मतमोजणी होईल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसोबतच जिल्हा मध्यवर्ती बँक, किसन वीर व कृष्णा सहकारी साखर कारखाना या तीन संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ७११ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम रद्द झाल्याने शासकीय यंत्रणेवरील ताण निवळला आहे. तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आता केवळ ८५ कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. (प्रतिनिधी)
७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना बे्रक !
By admin | Published: March 29, 2015 12:38 AM