लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा (जि. सातारा) : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जन्मगाव नायगावपुरते मर्यादित न ठेवता देशभरात आणि जगभरात त्यांचे विचार व कार्य पोहोचविले पाहिजे. नायगावचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. महाराष्ट्र शासन व महाज्योतीच्यावतीने राज्यभरात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ७२ वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत, अशी घोषणा अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.
नायगाव (ता. खंडाळा) येथे सोमवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रा. हरी नरके, बापूसाहेब भुजबळ, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, राष्ट्रवादी ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, पंचायत समिती सभापती अश्विनी पवार यांची उपस्थिती होती.
भुजबळ म्हणाले, ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्ञानसंकुल नायगाव येथे देशातील पहिली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अकादमी स्थापन करून या ठिकाणी एनडीए व स्पर्धा पूर्वपरीक्षा निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या संकुलासाठी व विविध बाबींचा विकास करण्यासाठी ओबीसी मंत्रालय व शासनाकडे ५० कोटी रुपयांचा आराखडा पाठविला आहे. नायगाव येथे निवासी प्रशिक्षण संस्था, निवासी शाळा व अन्य बाबींचा विकास महाज्योती संस्थेच्या माध्यमातून अद्ययावत करण्यात येणार आहे. नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंतरराष्ट्रीय स्वरूपाची करण्यात येईल. भिडेवाड्यात लवकरच ‘सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा’ याच नावाने सुरू करण्यात येणार आहे.
प्रशासनाची धावपळकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी होऊ नये यासाठी नायगाव येथील स्मारकास अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी साडेसात वाजताच आले. त्यामुळे प्रशासनाची व समितीची धावपळ झाली.