सातारा : कामगार दिनानिमित्त महावितरणच्या बारामती परिमंडलातर्फे उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी व उत्कृष्ट यंत्रचालक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या हस्ते ७४ कामगारांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बारामती येथील या कार्यक्रमास बारामती मंडलाचे अधीक्षक अभियंता केशव सदाकळे, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वामनराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य अभियंता इरवाडकर म्हणाले, ‘महावितरणच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर राहायला हवे. स्वत: बरोबरच आपल्या कंपनीचा व समाजाचा विकास करण्यासाठी उत्कृष्ट काम करण्याचा ध्यास घेतला पाहिजे.’ पुरस्कारप्राप्त कामगारांचे कौतुक करून ते म्हणाले, ‘ज्यांना पुरस्कार मिळाला आहे, अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांना चांगले काम करण्यासाठी आणि त्यांनाही असा पुरस्कार मिळावा यासाठी प्रोत्साहित करायला हवे. कर्तव्य बजावताना स्वत: बरोबरच इतरांच्याही सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे.’ कार्यकारी अभियंता मधुकर घुमे, दिलीप घाटोळ, श्रीनिवास चटलावार यांच्यासह अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्रीकृष्ण वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख लिपिक रामचंद्र साळगावकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) महावितरणच्या बारामती परिमंडलातर्फे कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महावितरणतर्फे ७४ गुणवंत कामगारांचा गौरव
By admin | Published: May 03, 2016 9:21 PM