सातारा : सातारा पालिका व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महालसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसात शहरातील तब्बल ७ हजार ४०० नागरिकांना कोरोना लस देण्यात आली.
कोरोनाचे संक्रमण रोखण्याबरोबरच लसीकरणापासून शहरातील एकही नागरिक वंचित राहू नये, यासाठी सातारा पालिकेने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवार, दि. २१ सप्टेंबरपासून महालसीकरण शिबिर सुरू केले आहे. पालिकेला पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून लसीचे ८ हजार डोस उपलब्ध करण्यात आले. पहिल्यादिवशी तेरा, दुसऱ्यादिवशी दहा, तर तिसऱ्यादिवशी पाच केंद्रांवर शिबिर घेण्यात आले. या केंद्रांवर तीन दिवसात ७ हजार ४०० नागरिकांना लस देण्यात आली. यापैकी ५ हजार ३७८ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला, तर २ हजार २२ नागरिक दुसरा डोस घेऊन लसवंत झाले.
पालिका प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे कोरोना नियमावलींचे पालन करत नागरिकांनी लस घेण्यासाठी सर्वच केंद्रांवर गर्दी केली. जागेवरच नाव नोंदणी व लस दिली जात असल्याने या शिबिराला सातारकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नव्याने हद्दवाढीत आलेल्या भागातही असे शिबिर राबवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.