सातारा: मंत्री व मंत्रालयातील सचिवांची ओळखीतून वाईन शाॅपचे लायसन्स देण्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील रिअल इस्टेट व्यवसायिकाची तब्बल ७५ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.विनायक शंकर रामुगडे, कलावती रामचंद्र चव्हाण (रा. सनराईज अपार्टमेंट गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घनशाम चंद्रहार भोसले (वय ४७, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) हे रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. त्यांना वरील दोघा संशयितांनी मंत्रालयात मंत्री व सचिव लोकांची ओळख असल्याचे खाेटे सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील वाईन शाॅप लायसन्स धारक प्रदीप जयस्वाल व प्रदीप खंदारे यांच्यापैकी एकाचे लायसन्स २ कोटी ५० लाख रुपयांमध्ये देतो, असे घनशाम भोसले यांना त्यांनी सांगितले.त्यामुळे त्यांनी ६५ लाख रुपये रोख आणि १० लाखांची रक्कम आरटीजीएस केली. हा व्यवहार २०१७ ते २०१९ या कालावधीत झाला. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना वाईन शाॅपचे लायसन्स मिळाले नाही. त्यामुळे भोसले यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक जगताप हे अधिक तपास करीत आहेत.