सचिन मंगरुळे/ म्हसवड (सातारा ): वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू उसेन बोल्टच्या तोडीची कामगिरी म्हसवड येथील ७५ वर्षीय मुसा दादूभाई मुल्ला करत आहेत. नियमित सराव करणाऱ्या खेळाडुंनाही 100 मीटर अंतर पार करण्यासाठी साधारणपणे 13 सेकंदांचा अवधी लागतो. मात्र, मुल्ला या वयातही 50 मीटरचे अंतर 9 सेकंदात पार करतात. त्यांच्या वयाच्यादृष्टीने ही कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. माण तालुक्यात विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणारी नररत्ने जन्मली आहेत. जगाच्या पातळीवर सातासमुद्रापार माण तालुका व म्हसवडचे नाव पोहोचवलेल्या ऑलिम्पिकपटू ललिता बाबर, चेतना सिन्हा यांच्यासह राज्य व देशपातळीवर प्रशासन सेवेत माणचा ठसा उमटविणारे अनेक अधिकारी व विविध क्रीडा प्रकारांत नवीन उद्योन्मुख खेळाडुंनी माण तालुक्याचे नाव सर्वदूर पोहोचवले आहे. मुसा यांच्या अंगात उपजतच वेगाने धावण्याचे कौशल्य होते. मात्र, त्यांच्या धावण्याचा सरावाकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतं. पूर्वी जी मंडळी रोज यांचा सराव बघायची त्यातली बरीच मंडळी या म्हाताऱ्याला वेड लागलंय का? असं म्हणायची. तीच मंडळी आज त्यांचं कौतुक करतायत. मुसाभाई मुल्ला यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जुने बी. कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी माण तालुका बाजार समितीत नोकरी केली. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. ते ७५ वयाच्या असले तरी व्यायाम व नियमित धावण्याचा सराव करतात. माण नदी किनारी असणाऱ्या बायपास रस्त्यावर सायंकाळी धावण्याचा सराव करतात. सध्या त्यांच्या धावण्याचं आणि रेकॉर्डब्रेक वेळेचे विशेष कौतुक होत आहे.
७५ वर्षांचा माणदेशी उसेन बोल्ट; या आजोबांचा वेग पाहून 'येडे' व्हाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 4:12 PM