सातारा : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू होऊनही अद्याप जोर नाही. त्यातच अतिवृष्टी होणाऱ्या भागातही पाऊस कमी आहे. आतापर्यंत कोयना येथे ९३३ तर महाबळेश्वर १४१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पण, गतवर्षीचा विचार करता या दोन्हीही ठिकाणी ७५० मिलीमीटर पावसाची तूट आहे. तर कोयना धरणातही १७ टीएमसी साठा कमी असल्याने चिंता वाढली आहे.जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनचा पाऊस दाखल होतो. पूर्व तसेच पश्चिम भागातही हजेरी लागते. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीला सुरूवात करतात. यंदा मात्र, निसर्गाचे चित्र बिघडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण, जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी पूर्व भागात काही प्रमाणात हजेरी लावली. त्यानंतर दडी कायम आहे.
परिणामी पेरण्या खोळंबल्या आहेत. तर पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाऊस तूट भरुन काढेल अशी अपेक्षा होती. मात्र, सध्यातरी तसे होताना दिसून येत नाही. कारण, गेल्या आठवड्यापासून पश्चिमेकडे पाऊस कमी आहे. त्यातच उघडझाप सुरू असल्याने धरण पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होते. त्यामुळे पाऊस उशिरा सुरू झालातरी तूट भरुन निघते. यंदा मात्र, आतापर्यंत तरी तसे दिसून आलेले नाही. मागीलवर्षी आतापर्यंत कोयनानगर येथे १६७५ मिलीमीटर पाऊस पडला होता. तर यंदा फक्त ९३३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर नवजा येथे गतवर्षी २१२१ मिलीमीटर पाऊस होता. यंदा आतापर्यंत १३४५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला दीड महिन्यात १४१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.मात्र, गतवर्षी १४ जुलैपर्यंत महाबळेश्वरला २१७४ मिलीमीटर पाऊस पडलेला. याचा अऱ्थ मागीलवर्षीपेक्षा कोयनानगरला ७४२, नवजा येथे ७७६ आणि महाबळेश्वरला ७६४ मिलीमीटरने पाऊस कमी झालेला आहे. यापुढे पाऊस जोर धरुन तूट भरुन काढणार का ? याविषयीही साशंकता आहे. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यातच कोयना धरणात गतवर्षी यावेळी ४३.१८ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या मात्र, २३.८९ टीएमसी झाला आहे. याचा अऱ्थ मागीलवर्षीपेक्षा जवळपास १७ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.
नवाजला २७ मिलीमीटर पाऊस...जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या पावसाची उघडीप आहे. तर पश्चिमेकडे उघडझाप सुरू आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कायेनेला अवघा १५ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे २७ आणि महाबळेश्वरला २१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.