कुडाळ : जावळी तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सरासरी ७५ टक्के मतदान झाले. तालुक्यातील २३ हजार ४१९ मतदारांपैकी ८ हजार ६७४ पुरुष आणि ९ हजार ११३ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कुडाळ ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीने ७४ टक्के, तर संवेदनशील असणाऱ्या सरताळेत ७६ टक्के व सर्जापूर तेथे विक्रमी ७९ टक्के मतदान झाले.
कुडाळ येथे १५ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. ५ हजार १९१ मतदारांपैकी ३ हजर ७९६ मतदारांनी हक्क बजावला. बामणोली तर्फ, कुडाळ येथे १९२० मतदारांपैकी १३९१ मतदारांनी हक्क बजावला. याठिकाणी सरासरी ७०.३० टक्के मतदान झाले. बेलावडेत ८९.६८ टक्के मतदान झाले.
सायगाव विभागात दीपक पवार व विद्यमान सभापती जयश्री गिरी यांच्या गटांमध्ये चुरस होती. या भागातील सायगावमध्ये ६७.३६, तर रायगावात ७७.५८ टक्के मतदान झाले. याशिवाय भालेघर, बेलावडे, अंधारी, कास गावातून एकही उमेदवार बिनविरोध निवडून न आल्याने सर्व जागांवर अटीतटीची लढत झाली. उर्वरित मोरावळे, पुनवडी, सनपाने, हातगेघर, आलेवाडी, करंदोशी, दरे बुद्रुक, नरफदेव, महीगाव, पवारवाडी, इंदवली, कोलेवाडी, हुमगाव, निझरे, मालचौंडी, काळोशी, म्हाते खुर्द, पिंपळी, वहागाव, काटवली, महामुलकरवाडी, दरेखुर्द, मरडमुरे, धोंडेवाडी, आपटी, निपाणी, वेळे, भिवडी, जरेवाडी या ग्रामपंचायतीसाठी काही जागांवर अंशतः निवडणूक झाली. याठिकाणी सरासरी ६० टक्केपेक्षा अधिक मतदान झाले आहे.
मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर सामाजिक अंतर तसेच सॅनिटायझरचा वापराबाबत आवश्यक ती काळजी घेण्यात आली होती. तालुक्यात सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.