वडूज : खटाव तालुक्यातील ९० पैकी ७६ ग्रामपंचायतींसाठी ७६.८० टक्के मतदान झाले. २६५ मतदान केंद्रांवर सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ५६३ सदस्य निवडीसाठी खटाव तालुक्यात १ हजार १८३ उमेदवारांचे नशीब मशीनमध्ये बंद झाले आहे.
खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यापूर्वीच १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ५६३ सदस्य निवडीसाठी तालुक्यात १ हजार १८३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून २०५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दीडपर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती. सायंकाळी साडेतीननंतर पुन्हा गर्दी झाली.
बहुतांशी ग्रामपंचायत निवडणूकीत आमने-सामने दुरंगी लढत पहावयास मिळाल्या. तर निमसोड, पुसेगावत अटीतटीच्या लढती झाल्या. ५१ हजार ५३८ महिला मतदार तर ५४ हजार ९४० पुरूष असे एक लाख ६ हजार ४७८ मतदारांनी हक्क बजावला. भुरकवडी, अंभेरी, शेनवडी, वांझोळी, कातळगेवाडी, गारूडी, गारवडी, गुंडेवाडी, हिवरवाडी, ढोकळवाडी, पुनवडी, अनफळे, दाळमोडी मानेवाडी-तुपेवाडी या १४ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.
पुसेसावळी, पुसेगाव, विसापूर, कलेढोण, पाचवड, धोंडेवाडी, अंबवडे, नागाचे कुमठे, चोराडे, जाखनगाव, चितळी, कातरखटाव, एनकूळ, येरळवाडी, बनपुरी, तडवळे, विखळे, निढळ व खातगूण या गावामध्ये दुरंगी लढत होत आहे.
खटाव तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठतेचा प्रश्न निर्माण झालेल्या पुसेगाव, निमसोड, एनकुळ, अंबवडे, पारगाव, कातरखटाव, येरळवाडी आदी ठिकाणी तुल्यबळ लढती झाल्याने तालुक्याचे लक्ष व राजकीय नेत्यांच्या लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे. शुक्रवार (दि. १५) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान झाले. तर सोमवारी (दि. १८) वडूज तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.