कुडाळ: जावळी तालुक्यातील रानगेघर याठिकाणी गुरुवारी सायंकाळी डोंगरातून शेळ्या माघारी येताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ८ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून ४ जखमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत माहिती अशी की, रानगेघर परीसरातील डोंगरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बाजीराव मोरे, रवींद्र मोरे यांच्या शेळ्या डोंगरात चरायला सोडल्या होत्या. शेळ्या माघारी येत असताना सायंकाळच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये ८ शेळ्यांचा मृत्यू झाला असून चार शेळ्या जखमी अवस्थेत आहेत.
वनविभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वीही या परिसरातील विकास जांभळे यांच्या दोन शेळ्यां बिबट्याने वस्तीतून पळवल्या होत्या. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
रानगेघर परिसरात जंगलाचे प्रमाण वाढल्यामुळे याठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. डोंगराच्या शेजारील वस्तीवर अधूनमधून बिबट्याचा हल्ला होत असून यामध्ये शेळ्यांचा बळी जात आहे. यात शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शासन व वनविभागाने याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी व होणाऱ्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्यावी.- ज्ञानेश्वर करंजकर,सरपंच रानगेघर.