महाबळेश्वर : महाबळेश्वरसह तालुक्यात धुवाॅंधार पाऊस पडत आहे. महाबळेश्वरला २४ तासात ८ इंच (२११ मिलिमीटर) पावसाची नोंद करण्यात आली. तर महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर वाघेरा गावाजवळ मुसळधार पावसामुळे दरड, माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक काहीवेळ ठप्प होती. दरम्यान, महाबळेश्वरला यावर्षी आतापर्यंत एकूण ६२३ मिलिमीटर (२४ इंच) पावसाची नोंद झाली तर मागील वर्षी आतापर्यंत २१ इंच पावसाची नोंद झाली होती.
महाबळेश्वर तालुक्यात ३ जूनपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मागील काही दिवसांपासून महाबळेश्वर परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता तर ११ जूनपासून पावसाचा जोर वाढू लागला. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर वाघेरा गावाजवळ दरड, माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक काहीवेळ ठप्प होती. बांधकाम विभागाला माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन जेसीबीच्या साह्याने दरड व माती काढून वाहतूक सुरू करण्यात आली.
महाबळेश्वर येथील अंबेनळी घाट व केळघर घाटामधील धबधबे फेसाळू लागले आहेत. त्यामुळे येणारे-जाणारे तुरळक पर्यटक थांबून धबधब्यावर आनंद घेत आहेत तर वेण्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ होऊ लागली आहे.
फोटो दि. १७ महाबळेश्वर पाऊस फोटो नावाने...
फोटो ओळ : महाबळेश्वर - तापोळा मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. (छाया : अजित जाधव)