सातारा : जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच आता खाकीलाही कोरोनाची धास्ती लागली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील ८० पोलीस कर्मचारी गृह विलगीकरणात गेले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात सध्या प्रचंड वेगाने कोरोना फैलावत आहे. संपूर्ण कुटुंबे बाधित आढळून आली आहेत. सध्या सर्व रुग्णालये फुल्ल आहेत. हीच परिस्थिती आता जिल्हा पोलीस दलातही दिसून येऊ लागली आहे. दोन पोलीस अधिकारी व ७८ पोलीस कर्मचारी घरीच विलग झाले आहेत. त्याचबरोबर पाच पोलीस अधिकारी, ३७ पोलीस कर्मचारी, ११ होमगार्ड, लिपिक एक असे ५४ कर्मचारी आयसोलेशनमध्ये आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने पोलीस दलही खडबडून जागे झाले आहे. सध्या आणीबाणीची परिस्थिती असली तरी अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आतापर्यंत जिल्हा पोलीस दलात ६६८ बाधित आढळून आले आहेत. सध्या ६३ जणांवर उपचार सुरू आहेत, तर ४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनातून उपचार घेऊन एकूण ६०० कर्मचारी बरे झाले आहेत. त्यामुळे पोलीस दलाला मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या एक पोलीस अंमलदार ऑक्सिजनवर, तसेच एक पोलीस अंमलदार व्हेंटिलेटरवर आहे. या दोघांची प्रकृती चिंताजनक असली तरी औषधोपचाराला हे कर्मचारी प्रतिसाद देत असल्याचे मुख्यालयातून सांगण्यात आले. एकीकडे पोलीस दलातही कोरोनाबाधितांची संख्या आढळून येत असतानाच लसीकरणही अत्यंत वेगाने सुरू आहे.
पहिला डोस २८५६ कर्मचाऱ्यांनी घेतला आहे, तर दुसरा डोस २३५९ कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. अद्याप ६३६ कर्मचारी व अधिकारी लस घेण्यापासून वंचित आहेत. त्याचे कारण म्हणजे लसीचा वारंवार होत असलेला तुटवडा. जिल्हा पोलीस दलालाही याचा फटका बसला आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांना खरे तर दोन्हीही डोस देणे गरजेचे आहे. रस्त्यावर अनेक लोकांशी पोलिसांचा संपर्क येतो. त्यामध्ये कोण बाधित आहे हे समजून येत नाही. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेसाठी शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे.
चौकट येणार आहे.
पोलीस मुख्यालयाचा फोटो वापरणे...