सातारा : पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांना शाळा सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या एकूण २ हजार ६९३ शाळा असून, पाचवी ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या ८ हजार शिक्षकांची शाळा सुरू होण्यापूर्वी कोरोना चाचणी होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग दिनांक २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. आतापर्यंत उपस्थितीचे प्रमाण ऐंशी टक्केच्या घरात आहे. त्यातच पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे घोषित केल्याने शाळांचीही तयारी सुरू झाली आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांप्रमाणे वेळापत्रक निश्चित करून तालुकास्तरावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत.
तालुक्याच्या ठिकाणी कोरोना चाचणी
जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यानुसार पाचवी ते आठवीसाठी अध्यापन करणारे शिक्षक तसेच शाळेतील अन्य शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना तपासणी केली जाणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने तालुका उपकेंद्रावर तपासणीची व्यवस्था करण्यात येणार असून, त्याबाबतचे नियोजन सध्या सुरू आहे. वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर शाळांना शिक्षण विभागाकडून सूचित केले जाणार आहे.
कोट
शासनाचे आदेश प्राप्त झाले असून, त्यानुसार शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. अध्यापन करणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना तपासणी केली जाणार आहे. लवकरच शाळांना याची माहिती दिली जाणार आहे.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या
पाचवी : २८,६३२
सहावी : २६,८५८
सातवी : २६,५१९
आठवी : १७,८९७