सातारा : जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी सरासरी ८४ टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यास निवडणूक यंत्रणेला यश आले आहे. मतमोजणी उद्या गुरुवार, (दि. ६) तालुक्यांच्या ठिकाणी होणार असून, दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील,’ अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत योजनाबध्द पध्दतीने राबविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीलाच कौतुक केले. ७११ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. त्यापैकी १६१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ५५० ग्रामपंचायतींपैकी वाई तालुक्यातील जोर, बालेघर व महाबळेश्वर तालुक्यातील भोसे या गावांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने प्रत्यक्षात ५४७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाले. ११ हजार ९५२ इतके मतदान कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते.एकूण ३ हजार ८४१ पदांसाठी ८ हजार ७०४ उमेदवार रिंगणात होते. ८ लाख ४८ हजार ७ उमेदवारांपैकी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दुपारी साडेतीनपर्यंत ६ लाख ३२ हजार २६९ मतदान झाले. यामध्ये स्त्रियांचे मतदान ३ लाख ११ हजार ६६५, तर पुरुषांचे मतदान ३ लाख २० हजार ६०४ इतके आहे. दुपारीच जिल्हाभरात ७४.५६ टक्के मतदान झाले होते. इतक्या मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. मतदानासाठी १ हजार ९५८ मशिन्स वापरण्यात आल्या. यामध्ये एकाही मशीनमध्ये बिघाड झाला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदान झालेल्या मशीन तालुक्यांच्या ठिकाणी स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या असून, त्या ठिकाणी पोलिसांचा कडा पहारा ठेवण्यात आला आहे. आज, बुधवारी मतमोजणी केंद्रावरही कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असून, मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)मतमोजणी दिवशी ‘ड्राय डे’मतमोजणीदिवशी गुरुवारी जिल्हाभर ‘ड्राय डे’ पाळण्यात येणार असून, मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. अनुचित प्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. हजारमाचीत मारामारीमतदारांची रांग लावण्याच्या कारणावरून हजारमाची (ता. कऱ्हाड) येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या प्रतिनिधींची मारामारी झाली. या प्रकारामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी तातडीने संबंधित मतदान केंद्रास भेट दिली. त्यांनी जमाव पांगविल्याने परिसरातील तणाव निवळला.
ग्रामपंचायतींसाठी ८४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2015 12:20 AM