सातारा : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वारकऱ्याचे वेशांतर करत चोरी, जबरी चोरी करणाऱ्या ७२ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली. तसेच अडीच तोळे सोन्याची जबरी चोरी करणाºया एकाला रंगेहाथ पकडत दोन दरोडेखोरांना अटक केली.
याबाबत माहिती अशी की, आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पाखली सातारा जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण व बरडमध्ये मुक्कामी होती. या पालखी सोहळ्यात संपूर्ण राज्यातून लाखो वारकरी सहभागी होत असतात. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे चोरी, जबरी चोरी व पाकीटमारी करून लोकांना लुटत असतात. त्याअनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने गुरुवार, दि. १२ पासून मंगळवारपर्यंत पालखी मार्गावर सापळा रचला. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वेशांतर करून संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवून होते. मुक्कामाच्या ठिकाणी बंदोबस्त करत असताना चोरी, जबरी चोरी, पाकीटमारी आदी गुन्हेगारी कारवाई करणाºया ८५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
पालखी सोहळ्यात एका महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाºया सिद्धार्थ संजय जाधव (वय १९, रा. शिरुर कासार, जि. बीड) याला ७५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. त्याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दरोड्याच्या गुन्ह्यातील विशाल नामदेव जाधव, गणेश सोनबा मदने (रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वेशांतर केल्याने माहिती मिळालीस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सागर गवसणे, शशिकांत मुसळे व पोलीस कर्मचारी साध्या वेशात न राहता पान, फुले, फुगे विक्रेते तसेच वारकऱ्याच्या वेशात वारीमध्ये गस्त ठेवल्याने गोपनीय बातमी काढून कारवाई करता आली.