सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या तुरळक स्वरुपात पाऊस होत असून, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ११ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात ८७.७८ तर उरमोडीत ८३.४२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात २५ दिवसांपूर्वी धुवाँधार पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तर तुफान वृष्टी झाली. यामुळे शेतीचे नुकसान झाले तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आली. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील पाणीसाठा ९० टीएमसीच्यावर पोहोचला होता. तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. सध्या पश्चिम भागात पाऊस तुरळक होत असल्याने धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे कोयना वगळता अन्य धरणांतून विसर्ग बंद आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ३ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजा येथे १ आणि महाबळेश्वरला सकाळपर्यंत ११ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जूनपासून कोयनेला ३,५०७, नवजा ४,५२२ आणि महाबळेश्वर येथे ४,६८८ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास २,१०० क्युसेक वेगाने पाणी येत होते तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणात ९२.३८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.
चौकट :
कण्हेर धरणात ८६ टक्के साठा...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत आहे तर अनेक धरण परिसरात पावसाची उघडीप आहे. असे असले तरी सद्यस्थितीत धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. येत्या काही दिवसात चांगला पाऊस झाल्यास धरणे ओव्हर फ्लो होतील. बुधवारी सकाळच्या सुमारास १३.५० टीएमसी पाणीक्षमता असणाऱ्या धोम धरणात ८६.१६ टक्के साठा होता. तर कण्हेर धरणाची क्षमता १०.१० टीएमसी असून, पाणीसाठा ८६.३८ टक्के झालेला आहे. उरमोडीची क्षमता ९.९६ टीएमसी आहे. या धरणात ८३.४२ टक्के तर तारळी धरणात ८९.७१ टक्के पाणीसाठा झाला होता. तारळीची साठवण क्षमता ५.८५ टीएमसी आहे.
..............................................................