सातारा : इमारतीच्या बांधकामाठी ९६ लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दत्ता जाधव आणि त्याच्या मुलासह १२ जणांवर (रा. प्रतासिंहनगर, सातारा) शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी लल्या ऊर्फ अजय जाधव याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला दि. ८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ठेकेदार हणमंत नारायण वलसे (वय ४६, रा. पीरवाडी, ता. सातारा) यांचे वसंतनगर येथे इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दि. २ रोजी रात्री दहा वाजता हणमंत वलसे साईटवर थांबले होते. त्यावेळी तेथे १० ते १२ जण युवक आले. ‘आम्ही दत्ता जाधवची माणसे आहोत, येथे काम करायचे असेल, तर एका प्लॅटचे दोन लाखांप्रमाणे ४८ प्लॅटचे ९६ लाख रुपये द्यावे लागतील,’ असे त्या युवकांनी सांगितले. वलसे यांनी नकार देताच, त्या युवकांनी त्यांना मारहाण केली. हा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या सखाराम रामू राऊत (वय ५०, रा. खेड) यानांही त्यांनी मारहाण केली. तसेच तेथील साहित्यांची तोडफोडही केली. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर शहर पोलिसांनी कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने प्रतापसिंहनगर येथे कोम्बिंग आॅपरेशन राबविले.त्यावेळी दत्ता जाधवचा मुलगा लल्या ऊर्फ अजय जाधव याला पोलिसांनी अटक केली. मात्र, इतर संशयित पसार झाले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर करीत आहेत. (प्रतिनिधी)
९६ लाखांच्या खंडणीसाठी मारहाण
By admin | Published: October 05, 2014 12:17 AM