कऱ्हाड : बनावट चेकद्वारे बँकेतून ८ लाख ९३ रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग करून बँकेसह संबंधित खातेदाराची फसवणूकप्रकरणी पाचपाखाडी-ठाणे येथील एकावर कऱ्हाड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. महेंद्र अजयमल गुप्ता (रा. रुम नंबर १२, देशमुखचाळ, नामदेववाडी, पाचपाखडी, ठाणे) असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून २०१४ रोजी महेंद्र गुप्ता याने कऱ्हाड येथील युको बँकेच्या शाखेत त्याच्या कोपरखैरणे येथील युको बँकेच्या शाखेतील खात्यावर कोपरखैराण येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील मणिक किचन इक्विपमेंट कंपनीच्या चालू खात्यातून देय असलेला ८ लाख ९३ हजार रुपयांचा चेक (क्रमांक १०९१) जमा केला. हा चेक युको बँकेच्या कऱ्हाड शाखेने वटवण्यासाठी बँक आॅफ इंडियाच्या कऱ्हाड शाखेत पाठविला. चेक कोअर बँकिंंग प्रणालीच्या माध्यमातून बँक आॅफ इंडियाच्या कऱ्हाड शाखेने पास करून चेकची रक्कम युको बँकेच्या शाखेत वर्ग केली. युको बँकेच्या शाखेने ही रक्कम कोपरखैराण शाखेतील महेंद्र गुप्ता यांच्या खात्यात त्याच दिवशी जमा केली. मणिक किचन इक्विपमेंट कंपनीच्या चालू खात्यातून ८ लाख ९३ हजार रुपये वर्ग झालेला चेक (क्रमांक १०९१) हा कंपनीकडे असून अन्य कोणत्याही व्यक्तीस अशाप्रकाराचा चेक दिला नसल्याचे कंपनी व्यवस्थापकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने बँक आॅफ इंडियाच्या कोपरखैराण शाखेत याबाबत तक्रार केली. चौकशीत महेंद्र गुप्ता याने बनावट चेकद्वारे ८ लाख ९३ हजार रुपये आपल्या खात्यात वर्ग करून बँकेसह संबंधित कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. (प्रतिनिधी)
नऊ लाखांचा बनावट धनादेश
By admin | Published: July 11, 2014 12:25 AM