कऱ्हाड : कऱ्हाड हा संवेदनशील उपविभाग. येथे अनेक गुन्हेगारी कारवाया घडतात. या गुन्हेगारी वृत्तींचा सामना काहीवेळा सामान्यांनाही करावा लागतो. हे करीत असताना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्याची वेळही त्यांच्यावर येते. कऱ्हाड उपविभागात कायदेशीर सोपस्कार पार पाडून तब्बल ९०५ जणांनी आपल्या कमरेला पिस्तूल अडकवले आहे.
पैसा, मालमत्ता, पूर्ववैमनस्य किंंवा संघर्षाच्या माध्यमातून अनेक वेळा काहीजणांवर जीवघेणा प्रसंग येतो. संबंधित व्यक्तीभोवती गुन्हेगारी कारवायांचा फास आवळला जातो. पैसा, मालमत्ता किंवा संघर्षाच्या कारणावरून गुन्हेगारी वृत्ती जिवावरही उठतात. त्यामुळे या गुन्हेगारी कारवायांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काहींवर शस्त्र बाळगण्याची वेळ येते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व परिस्थितीची पडताळणी केल्यानंतर प्रशासनाकडून अशा अर्जदारांना शस्त्र बाळगण्याचा रीतसर परवाना दिला जातो; मात्र, असा परवाना देतानाही प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी होते. त्याने ज्या कारणास्तव शस्त्राच्या परवान्याची मागणी केली आहे, त्या कारणाचीही खातरजमा केली जाते.
कऱ्हाड उपविभागाचा विचार करता येथे कायदेशीररीत्या स्वत:सोबत शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या तब्बल ९०५ आहे. त्यामध्ये राजकीय नेत्यांसह, बिल्डर, उद्योजक तसेच बंदूक वापरणाऱ्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे. संबंधितांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून स्वत:सोबत शस्त्र ठेवण्याचा परवाना घेतला आहे.
- चौकट
व्यापारी, बिल्डर : २४ टक्के
शेतकरी : २० टक्के
राजकीय व्यक्ती : १६ टक्के
संस्था पदाधिकारी : १८ टक्के
उद्योजक : २२ टक्के
- चौकट
परवान्यासाठी होणारी चौकशी
१) वैयक्तिक वर्तणूक
२) कौटुंबिक पार्श्वभूमी
३) वार्षिक उत्पन्न
४) एकूण मालमत्ता
५) दैनंदिन उलाढाल
६) आयकर देयक
- चौकट
२०९ शेतकऱ्यांकडे ‘सिंगल’, ‘डबल’ बार
वन्य श्वापद किंवा रानटी प्राण्यांपासून पिकाचे नुकसान होत असेल तर शेती संरक्षणासाठी म्हणून प्रशासनाकडून शेतकऱ्यांना शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला जातो. या परवान्यावर शेतकरी सिंंगल किंवा डबल बारची बंदूक वापरू शकतात. कऱ्हाड उपविभागात बंदूक बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २०९ आहे.
- चौकट
हद्दीतील शस्त्र परवाने
२०३ : कऱ्हाड शहर पोलीस
३११ : कऱ्हाड ग्रामीण पोलीस
१५८ : उंब्रज पोलीस ठाणे
२४ : तळबीड पोलीस ठाणे
२०९ : प्रादेशिक वन विभाग
- चौकट
वन विभागाचा अहवाल महत्त्वाचा
शेती संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना देताना वन विभागाने दिलेला अहवाल महत्त्वाचा ठरतो. परवान्यासाठी शेतकऱ्याला प्रांत कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो. त्यानंतर तलाठी व वनविभागाकडून अहवाल दिला जातो. या अहवालाच्या पडताळणीनंतर शेतकऱ्याला शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला जातो.
- चौकट
दरवर्षी नूतनीकरण
स्वसंरक्षण किंवा शेती संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याच्या घेतलेल्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. नूतनीकरण न केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- चौकट
... असा मिळतो परवाना
स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागतो. तेथून हा प्रस्ताव पडताळणीसाठी उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येतो. पोलिसांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तो पोलीस अधीक्षकांकडे व तेथून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जातो.
फोटो : २९केआरडी०४, ०५
कॅप्शन : प्रतीकात्मक