सातारा : साताऱ्यातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या शौर्य संदीप खामकर या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा डेंग्यूनेमृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. डेंग्यूने जिल्ह्यातील आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील एका युवकाचाही डेंगूने मृत्यू झाला आहे.शौर्य हा साताऱ्यातील एका शाळेत सातवीत शिक्षण घेत होता. रविवारी मध्यरात्री त्याला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. सकाळी साडेसात वाजता कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचारानंतर त्याला शहरातील अन्य एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तत्पूर्वी करण्यात आलेल्या तपासणीचा अहवाल दुपारी प्राप्त झाला. यामध्ये शौर्य याला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकृती थोडी गंभीर असल्याने शौर्यला साताऱ्यातील आणखी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्या रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्याला पुणे येथील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. येथे उपचारानंतर शौर्यच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली. परंतु, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक त्याच्या हृदयाचे ठोके बंद पडले अन् त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे खामकर कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने थोडं गांभीर्याने घ्यावंजिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा आरोग्य विभाग, हिवताप विभाग व पालिका प्रशासनाकडून डेंग्यू प्रतिबंधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम थंडावली असून, शहरात डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजनांची गती वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.