सातारा : जिल्ह्यात भाज्यांचे उत्पादन कमी असल्याने दरात मोठी वाढ झाली असून बहुतांशीचे दर ८० ते १०० रुपयांच्या घरात आहेत. यामध्ये एक लिटर डिझेल येत आहे. तर मिरची तिखटच असून टोमॅटोची लालीही वाढलेली आहे. त्याचबरोबर लसणाचा किलोचा दर १०० रुपयांवर तर वाटाणा, आले दीडशे रुपयांवर गेला आहे. भाज्यांच्या दरवाढीने सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, वाई, कऱ्हाड, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यात तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. येथील भाजीपाला स्थानिक बाजारात विक्रीसाठी नेण्यात येतो. तसेच बाजार समितीतही विक्री करण्यात येते. त्याचबरोबर अनेक शेतकरी पुणे-मुंबईच्या मार्केटमध्ये वाहनांतून भाजीपाला नेतात. या भाज्यांचा दर आवकच्या प्रमाणात ठरतो.सध्या भाज्यांची आवक कमी आहे. तसेच काही भागात पावसाची दडी असल्याने नवीन भाजीपाला बाजारात येत नाही. परिणामी भाज्यांचे दर आकाशाला गवसणी घालू लागले आहेत. यामुळे याचा फटका ग्राहकांना बसू लागला आहे. कारण, कोबी सोडला तर कोणतीही भाजी स्वस्त नाही. बहुतांशी भाज्याचे दर हे १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. तर काहींनी दीडशेचा टप्पा पार केला आहे. या भाज्यांच्या दरात एक लिटर पेट्रोल-डिझेल येत आहे.
भाज्या - दर रुपयात (किलोचे)वांगी ६० ते ८०टोमॅटो ८० ते १२०कोबी ३० ते ४०फ्लाॅवर ६० ते ८०दोडका ६० ते ८०कारली ६० ते ८०मिरची ८० ते १००ढबू ६० ते ८०भेंडी ६० ते ८०शेवगा ६० ते ८०वाटाणा १०० ते १५०काळा घेवडा १०० ते १५०
आले १५० रुपये किलो...सध्या आलेल्या चांगला दर मिळत आहे. किलोचा भाव दीडशे रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे १० रुपयाचे आले घ्यायचे झालेतरी एक-दोन तुकडे मिळत आहेत. या आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.
वाटाण्याला क्विंटलला १६ हजार...
वाटाण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रथमच क्विंटलचा भाव १६ हजार रुपयांपर्यंत गेला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला १० हजारांपासून दर मिळत आहे. यामुळे वाटाणा पाव किलो घ्यायचा झाला तर ४० रुपये मोजण्याची वेळ आलेली आहे. तर काळा घेवड्याला क्विंटलला १५ हजारापर्यंत दर मिळत आहे.