सातारा : साताऱ्यातील एका व्यावसायिकाची अमरावतीमधील व्यावसायिकाने सहा लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. खरेदी केलेली ताडपत्री व त्याचे पैसेही न दिल्याचे साताऱ्यातील व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अमरावतीमधील कृष्णा सालपे या व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संभाजी महादेव शिंदे (वय ४८, रा. गोडोली, सातारा) यांचे साताऱ्यातील रविवार पेठेमध्ये ‘शिंदे प्लास्टिक’ या नावाचे दुकान आहे. त्यांनी १ जून २०२१ रोजी अमरावतीमधील कृष्णा सालपे यांच्याकडून ९८०० किलोची ताडपत्री खरेदी करण्याचा व्यवहार करून त्यांना सहा लाख रुपये दिले. मात्र, ताडपत्री न देता तसेच शिंदे यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.हा प्रकार समोर आल्यानंतर शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी कृष्णा सालपे यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक डी. डी. मुसळे या अधिक तपास करीत आहेत.
साताऱ्यातील व्यावसायिकाची सहा लाखांची फसवणूक, अमरावतीमधील एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 4:23 PM