सातारा : ‘तुला या प्राॅपर्टीत राहायचे असेल तर मला १० लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अन्यथा तुझ्या गुडघ्यापासून खालचा पाय काढून टाकीन,’ अशी धमकी एका उद्योजकाला देण्यात आली. याप्रकरणी पाचगणी पोलिस ठाण्यात चाैघांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अनुप गाडे (वय ३६, रा. सातारा), सागर मेश्राम (वय २८) यांच्यासह अन्य अनोळखी दोघांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत पाचगणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय गणपत मोझर  (वय ४५, रा. भिलार, ता. महाबळेश्वर)हेउद्योजक असून, त्यांच्या कामगाराच्या फोनवर फोन करून संशयितांनी संध्याकाळी सात वाजता बंगल्यावर येणार असून, तुझा बंगला तुला फोडून दाखवितो, अशी धमकी दिली. दरम्यान, दि. १९ रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता संशयित तेथे गेले. अनुप गाडे याने उद्योजक मोझर यांना त्याच्या हातातील तलवार दाखवून ‘तुला या प्राॅपर्टीमध्ये राहायचे असेल तर मला १० लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल.
नाही दिलीस तर तुझ्या गुडघ्यापासून खालचा पाय काढून टाकीन,’ अशी धमकी दिली. तसेच बंगल्याच्या बाहेरचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान केले. या प्रकारानंतर संजय मोझर यांनी दि.२० रोजी रात्री साडेअकरा वाजता पाचगणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे हे करीत आहेत.