महाबळेश्वर (जि.सातारा) : दुर्मीळ जातीचे मऊ पाठीचे कासव आपल्या रिसाॅर्टमधील फिशटँकमध्ये पाळणे रिसाॅर्ट मालकाला अंगलट आले आहे. वन विभागाने कारवाई करून दुर्मीळ जातीचे कासव तर ताब्यात घेतलेच परंतु रिसाॅर्टचे मालक विजय बबन शिंदे (रा. हरचंदी, ता. महाबळेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर असलेल्या हरचंदी गावातील मोरेवाडी येथील नीलमोहर ॲग्रो रिसाॅर्टमधील फिशटँकमध्ये दुर्मीळ जातीचे व मऊ पाठीचे कासव रिसॉर्ट मालकाने पाळले आहे. अशी माहिती सोमवारी सकाळी वन विभागास मिळाली. यानुसार वन विभागाच्या पथकाने हरचंदी येथील रिसाॅर्टवर छापा घातला.रिसॉर्टमधील फिशटँकमध्ये दुर्मीळ व मऊ पाठीचे कासव आढळून आले. वन विभागाच्या विशेष पथकाने दुर्मीळ जातीचे कासव ताब्यात घेतले व हाॅटेलचे मालक विजय बबन शिंदे यांचेवर वन्यजीव संरक्षण १९७२ चे कलम २, ९, ३९, ४४, ५० व ५१ अन्वयेे वन गुन्हा दाखल केला आहे.
Satara: दुर्मीळ जातीचे कासव पाळले; महाबळेश्वरमधील रिसॉर्ट मालकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:52 AM