सातारा : साताऱ्यातील कृष्णानगरच्या एका शासकीय कार्यालयातील अभियंत्याच्या दालनात वाद घालून कागदपत्रे विस्कटण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार याप्रकरणी उपकार्यकारी अभियंता आनंद तानाजी सावंत यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आशिष बाबूराव हुंबे (रा. शिरंबे, ता. कोरेगाव), संदीप रवींद्र कांबळे (रा. संगमनगर सातारा), समाधान निकम (पूर्ण नाव नाही, रा. जांभ, ता. काेरेगाव), नेताजी राजाराम खराडे (रा. दरूज, ता. खटाव) आणि नीलेश आनंदराव जायकर (रा. शिवथर, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.दि. २७ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास कृष्णानगरमधील यांत्रिकी विभागातील उपकार्यकारी अभियंत्यांच्या दालनात हा प्रकार घडला. शासकीय काम करू नये, म्हणून संशयितांनी वादविवाद करून टेबलावरील कागदपत्रे विस्कळीत केली, तसेच तक्रारदाराला धक्काबुक्की करत शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. सातारा शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.
Satara: अभियंत्याच्या दालनात वाद घातला; पाच जणांवर गुन्हा दाखल
By नितीन काळेल | Published: June 28, 2024 6:18 PM