कऱ्हाड/कोयनानगर : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ललीत पाटील प्रकरणात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव घेतल्याच्या कारणावरुन नागरीकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव सुषमा अंधारे यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात घेतल्यामुळे गत काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांच्यावर सुषमा अंधारे यांनी आरोप केले आहेत. मात्र, शंभूराज देसाई यांनी या सर्व आरोपांचे खंडण करीत सुषमा अंधारे यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सांगीतले होते. तसेच अंधारे यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, शंभूराज देसार्इंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत रविवारी पाटणमधील नागरीकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी अर्ज दाखल केला. त्यानुसार पाटण पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्यावर भा. दं. वि. सं. कलम ५०० अन्वये अब्रू नुकसानीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप कामत तपास करीत आहेत.