सिद्धार्थ सरतापे
वरकुटे-मलवडी : पानवण येथील मोडेकरीवस्ती येथे आज, शुक्रवारी रस्ता पाहणीसाठी आलेले तहसीलदार श्रीशैल्य वट्टे यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांसमोरच दोन्ही गटांत दगड गोट्यांनी तुफान हाणामारी झाली. यामध्ये तीन पुरुषांसह एक महिला जखमी झाली. यामुळे उपस्थित सर्वांचीच दाणादाण उडाली. रस्ता पाहणी अर्ध्यावरच सोडून तहसीलदार परतले. याप्रसंगी अव्वल कारकून सुशांत पावरा, तलाठी शाम सूर्यवंशी आदी शासकीय कर्मचारी उपस्थित होते.याबाबत माहिती अशी की, पानवण येथील कुटेवस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांचा एक वर्षापासून गट ७६२, ७६३ चा दहिवडी तहसीलदार कार्यालयाच्या दरबारात रस्त्यासाठी वाद सुरू होता. यामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून रहिवासी असलेल्या १५ घरांतील जवळपास ७० नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांसुद्धा येण्या जाण्यासाठी रस्ता नाही. यामुळे वस्तीवर राहणाऱ्या लहान थोरांसह ग्रामस्थांना अनेक अडचणी येत असल्याने जवळपास १४ घरांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. याबाबत रस्त्याच्या मागणीसाठी एक वर्षापासून कुटे वस्तीवरील ग्रामस्थ प्रयत्न करीत होते. मात्र तहसील विभागातील अधिकाऱ्यांनी तीनवेळा अनेक कारणास्तव संबंधित ठिकाणचा रस्ता पाहणी दौरा रद्द केला होता.रस्त्याचा पाहणी दौरा आज, शुक्रवारी आयोजित केला होता. दौऱ्या दरम्यान तहसीलदारांसमोरच रस्त्यावरच दगड गोट्यांच्या साह्याने तुफान हाणामारी झाली. यामध्ये रामू भगवान कुटे, नामदेव महादेव शिंदे, सोनाली रामू कुटे, भिवा सोमा शिंदे, दादासाहेब बापू शिंदे हे चौघेजण जखमी झाले. त्यांना म्हसवड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती म्हसवड पोलीस ठाण्याचे एपीआय राजकुमार भुजबळ यांना समजताच ताबडतोब त्यांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यापुढील रस्ता पाहणी दौरा तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्तातच करावा मगच शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी पानवन येथील जाणकार ग्रामस्थांनी केली आहे.