लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: दहावीतील मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणारा एका शाळेचा लिपिक रामदास पोपट गाडे (वय ३३, रा.लाखानगर, वाई) याला विशेष न्यायाधीश ए.के.पटणी यांनी दहा वर्षांची शिक्षा सुनावली. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, एका शाळेमध्ये दहावीच्यावर्गात शिकणाऱ्या पंधरा वर्षांच्या मुलाला लिपिक रामदास गाडे याने बोलावून घेतले. ‘तू जर माझ्याबरोबर आला नाहीस तर तुला नापास करेन. तुझे शाळेतील मुलीशी प्रेमसबंध आहेत, अशी तुझी बदनामी करेन’ असे म्हणत त्याने दमदाटी केली. आपली बदनामी होईल याभीतीने संबंधित मुलगा गाडेसोबत जायचा.
एका बंगल्यामध्ये मोबाईलवर मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा. हा प्रकार तब्बल वर्षभर सुरू होता. एके दिवशी मुलाने आपल्यासोबत घडत असलेला प्रकार घरातल्यांना सांगितला. तेव्हा घरातले हादरून गेले. वाइ पोलिसांनी तत्काळ गाडेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी या प्रकरणाचा तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुनन्यायालयाने लिपिक रामदास गाडे याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी व सहायक सरकारी वकील नितीन मुके यांनी काम पाहिले.