सातारा : शहर परिसरातील एका महाविद्यालयात एमफाॅर्मचे शिक्षण घेणाऱ्या प्रशांत हवगीराव मारफळे (वय २३, रा. मुखेड, जि. नांदेड) याने साताऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, दि. १० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता उघडकीस आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रशांत मारफळे याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका महाविद्यालयात एमफाॅर्मलाप्रवेश घेतला होता. त्यातील केवळ दोन दिवस तो काॅलेजला गेला. वाढे फाटा परिसरातील साई निवारा या इमारतीमधील फ्लॅटमध्ये तो मित्रासमवेत भाड्याने खोली घेऊन राहात होता. शुक्रवारी दुपारी तो काॅलेजला गेला नाही. त्याचा रुमपार्टनर प्रथमेश चाैधरी (२४, रा. डाळमोडी, पो बोंबाळे, ता. खटाव, जि. सातारा) हा काॅलेजला गेला होता. सायंकाळी साडेपाच वाजता तो रुमवर आला. त्याने दरवाजा वाजविला असता आतून त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. प्रशांत झोपला असेल, असे समजून त्याचा मित्र थोडा वेळ बाहेरच थांबला. त्यानंतर त्याने पुन्हा दरवाजा वाजविला. मात्र, तरी सुद्धा आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने इमारतीमधील अन्य काही जणांना याची माहिती दिली. ते लोकही त्याच्या मदतीला आले. शेवटी याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस आल्यानंतर त्यांनी दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रशांत मारफळे याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.या प्रकाराची माहिती पोलिसांनी त्याच्या घरी दिल्यानंतर त्याचे वडील आणि भाऊ नांदेडहून शनिवारी सकाळी साताऱ्यात आले. पोलिसांनी खोलीची पूर्णपणे झडती घेतली. मात्र, चिठ्ठी अथवा संशयास्पद काहीही सापडले नाही. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल का उचलले, हे पोलिसांना अद्याप समजले नाही. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार राजेंद्र तोरडमल हे अधिक तपास करीत आहेत. तो चिंतेत होता...साताऱ्यात शिक्षणासाठी आल्यानंतर प्रशांत अत्यंत चिंतेत होता. फारसा कोणाशी बोलायचाही नाही. त्याने कोणत्या प्रकारचे टेन्शन घेतले होते. हे त्याच्या घरातल्यांनाही माहिती नाही. पोलिसांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेतला असून, याद्वारे आत्महत्येमागच कारण काही मिळतेय का, हे पोलिस तपासत आहेत.
नांदेडच्या महाविद्यालयीन तरूणाची साताऱ्यात आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
By दत्ता यादव | Published: February 11, 2023 7:11 PM