सातारा: कर्नाटकातून गुटखा भरून पुण्याकडे निघालेला कंटेनर शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडला. या कंटेनरमध्ये तब्बल ४७ लाखांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून, ही कारवाई सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास करण्यात आली.गुफाराम शमीम खान (वय ३६, रा. आयशा बिल्डिंग, भाेलेनाथ नगर, मुंब्रा ठाणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकातून गुटखा भरून कंटेनर पुण्याकडे जाणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शेंद्रे, ता. सातारा येथील ‘राजस्थानी हायवे’ या नावाच्या हाॅटेलजवळ सापळा लावला. दुपारी साडेचार वाजता कंटेनर शेंद्रे येथे येताच पोलिसांच्या पथकाने कंटेनर अडवला. पोलिसांनी चालकाकडे विचारपूस केली असता त्याने कंटेनरमध्ये विविध कंपनीचा गुटखा असल्याचे सांगितले. अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर, इम्रान हवालदार यांना पोलिसांनी बोलावून घेतल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी आले. त्यांच्या समक्ष पंचनामा झाल्यानंतर कंटेनरमधील गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला. तब्बल ४७ लाखांचा गुटखा सापडल्याने अजूनही मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याचे समोर येत आहे. या कारवाईमध्ये सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमीत पाअील ,मदन फाळके, अतीश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, सचिन साळुंखे, अमीत सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, ओंकार यादव आदींनी भाग घेतला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॅकिंग न ओळखून येण्यासारखे..संपूर्ण कंटेनर गुटख्याने तुडूंब भरलेला होता. पोत्यात आणि बाॅक्समध्ये गुटखा पॅक करून पद्धशीरपणे ठेवला होता. जणूकाही वेगळा कोणता तरी माल यात आहे, असे भासविले होते. परंतु पोलिसांच्या अचूक माहितीमुळे गुटख्याची तस्करी उघडकीस आली.