दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाशेजारील खिंडवाडी येथे सातारा मार्केट समितीच्यावतीने मार्केटयार्ड उभारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन करण्याचे नियोजन बाजारसमितीचे पदाधिकारी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले होते. त्यापूर्वीच याठिकाणी दाखल झालेल्या उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणचे निवारा शेड उलथवून टाकत भूमिपूजनास विरोध केला. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दोघेही समोरासमोर आल्यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला. अखेर दोघांनीही वेगवेगळी भूमिपूजने करत आपलीच भूमिका योग्य असल्याचे ठणकावून सांगितले.
सातारा शहराजवळील खिंडवाडी येथे मूळ मालक खासदार उदयनराजे भोसले आणि काही कूळांच्या ताब्यात सुमारे १६ एकर जमीन होती. ही जमीन शासनाकडून बाजारसमितीने ताब्यात घेतली आहे. त्याठिकाणी मार्केट, गुरांचा बाजार, क्लोड स्टोअरेज करण्याचे नियोजन आहे. यामुळे शहराच्या बाहेरच लोकांची घाऊक खरेदी विक्री होईल असे बाजार समितीचे नियोजन आहे. तर याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजीनगर ग्रामपंचायतीला आरोग्य आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने त्याठिकाणी पाण्याची टाकी, आरोग्यकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. यावरुन राजेंच्या दोन्ही गटामध्ये वाद निर्माण झाला.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह बाजार समितीचे संचालक मार्केट यार्डच्या भूमिपूजनासाठी उपस्थित होणार होते. त्यापूर्वीच साडे नऊ वाजता खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी आणण्यात आलेेले निवारा शेड आणि मंडप उद्धवस्त केला. त्यामुळे वातारणात तणाव निर्माण झाला. थोड्या वेळात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दोघेही घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही राजेंच्या उपस्थितीमुळे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. याच परिस्थितीत ठरल्याप्रमाणे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुदळ मारुन उद्घाटन केले. कार्यकर्त्यांनी नारळ फोडले. तर दुसऱ्या बाजूला घोषणाबाजी सुरुच होती.
या उद्घाटनानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनीही संभाजीनगर ग्रामपंचायतीसाठी पाण्याची टाकी, फिल्टरेशन टँक आणि आरोग्य केंद्राचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे पुढील काळातही हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.