कऱ्हाड : विद्यानगर येथे पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने दरोड्यासह इचलकरंजीतील माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरू केला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर येत असून बबलू जावीर हा टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.पोलिसांनी सांगितले की, विद्यानगर येथील जयराम कॉलनीत दरोड्याच्या उद्देशाने जमलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला सोमवारी दुपारी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून पकडले. याप्रकरणात बबलू ऊर्फ विजय संजय जावीर (वय ३२, रा. शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), निकेत वसंत पाटणकर (रा. गोडोली, सातारा), सूरज नानासाहेब बुधावले (रा. विसापूर-पुसेगाव, जि. सातारा), राहुल अरुण मेमन (रा. केरळ, सध्या रा. विद्यानगर, कऱ्हाड) व आकाश आनंदा मंडले (रा. खटाव, जि. सातारा) या पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन देशी बनावटीची पिस्तूल तसेच जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. ही टोळी दरोड्याच्या तयारीत होती, अशी माहिती तपासातून समोर आली असतानाच इचलकरंजीतील माजी नगरसेवकाच्या हत्येचा कटही टोळीने रचला होता, असे उघडकीस आले आहे.संशयित बबलू जावीर याने ही टोळी तयार केली होती. त्याला पूर्ववैमनस्यातून इचलकरंजीतील माजी नगरसेवकाची हत्या करायची होती. या माजी नगरसेवकाचे सार्वजनिक गणेश मंडळ आहे. तर बबलू जावीर याचेही दुसरे मंडळ आहे. संबंधित माजी नगरसेवक आणि बबलू जावीर याच्यात पूर्ववैमनस्य होते. त्यातूनच जावीरच्या मंडळाशी संबंधित एकाची हत्या झाली होती. त्यामुळे कारागृहात असताना जावीरने टोळी बनवून संबंधित माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठीच पैसे उभे करण्यासाठी ही टोळी दरोडा टाकणार होती, असे तपासातून समोर आले आहे.
सहा दिवस पोलिस कोठडीकऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने या टोळीला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरोडा आणि माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट याबाबत पोलिस या टोळीकडे तपास करणार आहेत.