पिंपोडे- पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील एस. टी. बसस्थानक परिसरात मुख्य बाजारपेठेत दत्तात्रय काशिनाथ महाजन यांच्या राहत्या घराला व शेती औषधी दुकानाला बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणत्याही स्वरूपाची जीवित हानी झाली नाही. स्थानिक पाण्याचे टँकर व वाई नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
महाजन यांनी कोरेगाव येथील प्रसिद्ध व्यावसायिक अनिल ढोले यांच्या ॲग्रो हायटेक समुहास भाडेतत्त्वावर दुकान गाळे दिले असून तेथे असणाऱ्या ॲग्रो हायटेक या दुकानाला पहाटेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु ७० ते ८० लाख रूपांच्या दरम्यान नुकसान झाले आहे.क्षणात लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट व काळा धूर पसरलेला होता. आगीचे वृत्त समजताच पिंपोडे बुद्रुक येथील युवक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी तातडीने पुढाकार घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. वाई नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या बंबच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.