सातारा : सातारा शहरात पावसाची उघडझाप सुरू असून पश्चिम भागातही जोर कमी झाला आहे. तरीही सततच्या पावसामुळे झाडे पडणे, दरड कोसळण्याच्या घटना सुरू आहेत. गुरूवारी पहाटेच्या सुमारास तर सातारा-ठोसेघर मार्गावरील सज्जनगड परिसरात दरड कोसळली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. तर कोयना धरणक्षेत्रातपाऊस सुरूच असल्याने दिवसांत सव्वा टीएमसीने वाढ झाली. धरणात २४ टीएमसीवर साठा आहे.जिल्ह्यात मागील २५ दिवसांपासून पाऊस पडत आहे. सुरुवातीला पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाचे प्रमाण चांगले राहिले. विशेषत: करुन पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यात चांगला पाऊस झाला. यामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. तसेच बंधाऱ्यात आणि पाझर तलावातही चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी झाली. तर पश्चिम भागात मागील चार दिवसांत संततधार होती.कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर भागात दमदार पाऊस झाला. लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला होता. त्यातच या पावसाने रस्त्यावर छोट्या दरडी कोसळणे, वृक्ष पडणे अशा घटना घडल्या. पण, बुधवारपासून पश्चिमेकडे पावसाचा जोर कमी झाला आहे.गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे सर्वाधिक ६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे ४१ आणि महाबळेश्वरला ४४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर एक जूनपासून सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे १ हजार २७७ मिलीमीटर झाले. यानंतर कोयना येथे १ हजार १४७ आणि महाबळेश्वरमध्ये १ हजार ६६ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असलीतरी आवक सुरू आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास १५ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा २४.३१ टीएमसीवर पोहोचला आहे. २४ तासांत धरणसाठ्यात १.३१ टीएमसीने वाढ झाली आहे.
Satara: सज्जनगडाजवळ दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत
By नितीन काळेल | Published: July 04, 2024 1:09 PM