सातारा : वाई तालुक्यातील बावधन नाका येथे स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करून एका शिकाऱ्याकडून अक्षरश: डोळे दिपवणारा अवैध शस्त्रसाठा हस्तगत केला. त्यामध्ये ३ गावठी पिस्तूल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेली काडतुसे, दोन धारदार तलवारी, काळविटाची शिंगे आणि वाघाच्या नखांचा समावेश आहे. अविनाश मोहन पिसाळ (वय ४०, रा. बावधन नाका, ता. वाई, जि. सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या शिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बावधनमधील अविनाश पिसाळ याच्याकडे अवैध शस्त्रसाठा तसेच प्राण्यांचे काही अवयव आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या विशेष पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. हे पथक रविवार, दि. २९ रोजी सायंकाळी बावधन येथे गेले. अविनाश पिसाळ याने एक स्वतंत्र फ्लॅट घेतला असून, त्या फ्लॅटमध्ये हा शस्त्रसाठा त्याने ठेवला होता. पोलिसांच्या पथकाने फ्लॅटमध्ये जाऊन पाहिले असता मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा दिसला. हा सर्व शस्त्रसाठा पोलिसांनी हस्तगत केला. अविनाश पिसाळ याला शिकारीचा छंद आहे. यासाठी त्याने हा शस्त्रसाठा अवैधरीत्या जवळ बाळगला होता. त्याच्यावर वाई पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम व वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला वाई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मदन फाळके, अतीश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, सनी आवटे, अमित माने, गणेश कापरे, प्रवीण पवार, पृथ्वीराज जाधव आदींनी या कारवाईत भाग घेतला.
वर्षात ५८ पिस्तूल हस्तगत..नोव्हेंबर २०२२ ते आजअखेर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकूण २९ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ८४ आरोपींकडून तब्बल ५८ पिस्तूल, गावठी कट्टे, १६० वापरलेल्या रिकाम्या पुंगळ्या हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. एका वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करणारी सातारची एलसीबी महाराष्ट्रात एक नंबरवर आहे.