प्रगती जाधव-पाटील
सातारा : भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सोपे आणि स्वस्त शिक्षण आणि आधुनिक प्रयोगशाळा असल्यामुळे संशोधनाची संधी उपलब्ध होणे हेच युक्रेनला जाण्याचे महत्त्वपूर्ण कारण असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध पेटल्यानंतर तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न समोर आला.
युक्रेनमध्ये असलेले जवळपास सर्वच विद्यार्थीवैद्यकीय शिक्षणासाठी तेथे जात असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतात एमबीबीएस शिक्षण घेणाऱ्यांना शासकीय कोट्यातून सीट मिळाली नाही तर किमान दीड कोटी रुपयांचा खर्च शिक्षणासाठी होतो. ज्या पालकांची पैसे भरण्याची क्षमता आहे, ते खासगीतून शिक्षण पूर्ण करतात. ज्या पालकांकडे इतके पैसे नाहीत; पण पाल्याला वैद्यकीय क्षेत्रातच कारकीर्द घडवायची आहे, त्यांच्यासाठी युक्रेनचा पर्याय सर्वोत्तम ठरतो.
या अनोख्या अभ्यासक्रमांचाही समावेश
रशियासारख्या देशामध्ये वैद्यकीय पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हायरोलॉजी, इम्युनॉलॉजी आणि जेनेटिक़्स हे तिन्ही स्वतंत्र विषय आहेत. या अभ्यासासाठी तिथे स्वतंत्र प्रयोगशाळाही सुरू करण्यात आल्या असून, त्यांत संशोधनाचे कामही मोठ्या प्रमाणावर चालते. भारतीय अभ्यासक्रमात मात्र, या विषयावरील प्रश्न अवघ्या पाच मार्कांचे असतात. याबरोबरच रुग्णांबरोबरचे वर्तनशास्त्रही स्वतंत्रपणे शिकविले जाते.
यासाठी युक्रेनला पसंती
- रशिया, युक्रेन, जर्मनी, आदी देशांमध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम शिकायला जाणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे.
- याचे कारण तेथील अनेक विद्यापीठे अत्यल्प दरामध्ये शिक्षण उपलब्ध करून देतात.
- शिक्षण, निवास आणि खाण्याचा एकूण पाच वर्षांचा एमबीबीएसचा खर्च ४० ते ५० लाख रुपयांपर्यंत होतो. तोच खर्च भारतात दीड कोटी रुपयांपर्यंत असतो.
- एमबीबीएस होण्यासाठी खर्च (प्रतिवर्ष)
- शासकीय कोटा : १.२५ लाख अधिक निवासाची सोय
- अनुदानित विद्यापीठ : १२ ते १५ लाख अधिक निवास
- अभिमत विद्यापीठ : २० ते २५ लाख अधिक
- निवास
- युक्रेन : ३० ते ४० लाख रुपये ५ वर्षांसाठी निवासासह
परदेशात आधुनिक शिक्षण मिळते यात शंका नाही; पण वैद्यकीय शिक्षणात भारतातील अभ्यासक्रम सर्वोत्तम आहे. युक्रेनला सोपं आणि स्वस्त शिक्षण घेऊन आलेल्यांना पात्रता परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने वर्षभर अभ्यास करून मग उत्तीर्ण व्हावंही लागतं, ही वस्तुस्थिती आहे.- डॉ. गौरव शिंदे, विद्यार्थी