- निलेश साळुंखे
कोयनानगर (सातारा) : पाटण तालुक्यातील हेळवाकमध्ये श्वानाचा पाठलाग करत असताना बिबट्या थेट घरात घुसला. यावेळी शेतकरी रमेश कारंडे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत दरवाजा बाहेरून बंद केला. त्यामुळे बिबट्या घरातच कोंडला गेला. ही घटना गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन्यजीव विभागाचे अधिकारी हेळवाकमध्ये दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हेळवाक येथील रमेश कारंडे हेही गुरुवारी रात्री कुटुंबीयांसह घराबाहेर थांबले होते. त्यावेळी घरातील् श्वान अन् त्याच्या पाठीमागे बिबट्या त्याठिकाणी आला.
बिबट्यापासून वाचण्यासाठी श्वान थेट घरात पळाले. बिबट्याही त्याच्यापाठोपाठ घरामध्ये घुसला. हा प्रकार पाहताच घाबरलेल्या कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखून तातडीने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यामुळे बिबट्या आत कोंडला गेला गावातील काही युवकांनी घराची खिडकी उघडून पाहिले असता बिबट्या आतमध्येच वावरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
युवकांनी त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबतची माहिती तातडीने वन आणि वन्यजीव विभागाला देण्यात आली. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात होते.