सातारा : बांबू प्रोसेसिंग युनिट स्थापण्यासाठी परदेशातून कर्ज प्रकरण करून देतो असे म्हणून एकाची सुमारे १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात साताऱ्यातील एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याप्रकरणी कुशल साताप्पा कुकडे (रा. आपटेनगर कोल्हापूर) यांनी तक्रार दिली. त्यानुसार दिलीप अरविंद प्रभुणे (रा. शाहूनगर, सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.तक्रारीनुसार गेल्यावर्षी ११ फेब्रुवारी ते २२ ऑक्टोबर यादरम्यान साताऱ्यात शाहूनगरमधील प्रभुणे मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनी नावाच्या कार्यालयात हा प्रकार घडला. बांबू प्रोसेसिंग युनिट स्थापन करण्यासाठी संशयिताने तक्रारदारास परदेशातून कर्ज प्रकरण करून देतो असे सांगितले. तसेच विविध कागदपत्रांची मागणी केली. कर्ज प्रकरणासाठी लागणारी कागदपत्रे तयार करून तक्रारदार कुशल कुकडे यांच्या सह्या घेत त्यांना एक प्रत देत विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी कारणे सांगून कर्ज मंजुरीसाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले. अशाप्रकारे १२ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कर्ज देतो म्हणून कोल्हापुरातील एकाची १३ लाखांची फसवणूक, साताऱ्यातील एकावर गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:59 IST