लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: वाई तालुक्यातील एका गावात बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. मावस भावाच्या अत्याचारातून बहीण प्रसूत झाली. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात संबंधित मावस भावावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही नात्याने मावस बहीण-भाऊ, तिचे वय १६ तर त्याचे वय २९. बहीण अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही भावाने तिच्यावर त्याच्या व तिच्या घरात कोणी नसताना वारंवार अत्याचार केला. हा प्रकार मे २०२३ ते २०२४ या कालावधीत घडला. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर काही महिन्यांनंतर मुलीची प्रसूतीही झाली. तिने मुलाला जन्म दिला. या प्रकारानंतर पीडित मुलीने १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने भुईंज पोलिसांनी संबंधित मावस भावाला तातडीने अटक केली. पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील हे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, दोघेही नात्याने मावस बहीण-भाऊ असल्यामुळे भावाच्या कृत्याचा घरातल्यांना अंदाज आला नाही. जेव्हा मुलगी गरोदर राहिली तेव्हाच दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा गजब झाला. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे पोलिसांसह समाजमनही सुन्न झाले आहे.