सातारा : मुलाची तहान भागविण्यास गेलेल्या आईचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील फडतरवाडी येथे सोमवारी (दि.२८) घडली.
स्वाती सुनील अंभोरे (वय २६, रा. फडतरवाडी, ता. सातारा. मूळ रा. बिबी, ता. शिवली, जि. जालना) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या ऊसतोड महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फडतरवाडीतील दरे नावाच्या शिवारात ऊसतोड सुरू आहे. या ठिकाणी जालनातील मजूर काम करत आहेत.
यावेळी स्वाती हिचा मुलगा आशिष याला तहान लागली. त्यामुळे स्वाती या कासावीस झाल्या. जवळच विहीर असल्याने त्या पाणी आणण्यासाठी विहिरीजवळ गेल्या. त्या विहिरीला पायऱ्या नसल्यामुळे स्वाती अंभोरे यांनी बादलीला दोरी बांधून बादली विहिरीत टाकली. त्यावेळी त्यांचा अचानक पाय घसरला. त्यामुळे त्या विहिरीत पडल्या. बराचवेळ झाला तरी त्या परत आल्या नाहीत म्हणून पती सुनील अंभोरे हे विहिरीवर गेले. तेव्हा त्यांना स्वाती यांची चप्पल व घागर विहिरीच्या काठाला पडलेली दिसली तर बादली दोरीसह पाण्यावर तरंगत होती.
नक्कीच काही तरी विपरीत घडल्याची जाणीव सुनील अंभोरे यांना झाल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर त्यांनी विहिरीत उडी मारून स्वातीचा शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाही. काही वेळानंतर इतर मजूर त्या ठिकाणी आले. त्यांनीही विहिरीत उतरून शोध घेतला असता स्वाती यांचा मृतदेह आढळून आला.
मुलाची तहान भागविताना आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ऊसतोड मजुरांमधून हळहळ व्यक्त होत आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार वायदंडे हे अधिक तपास करीत आहेत.