मलकापूर : मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून अवजड वाहतुकीने उपमार्गाला खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांत अपघात होऊन आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला. शनिवारी झालेल्या अपघातात खड्डा चुकविण्याच्या नादात गाडी घसरून महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्याने महिलेचा बळी घेतला, अशी चर्चा परिसरात होती.महामार्गाच्या सहापदरीकरणासह उड्डाणपुलाचे काम सुरू नसल्यामुळे एक वर्षापासून महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंच्या उपमार्गावरून वळविण्यात आली आहे. अवजड वाहतूक उपमार्गावरून होत असल्याने दोन्ही उपमार्गाला भेगा पडल्या आहेत. कोयना पूल ते नांदलापूर परिसरात ठिकठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून विविध कामांसाठी खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजविल्यामुळे सुरुवातीला एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर काही दिवसांतच खड्ड्यात आपटून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होती. त्यानंतर ट्रक-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला होत. असे आतापर्यंत वेगवेगळ्या अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी पुन्हा एकदा खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. त्यामुळे महामार्गावर खड्ड्यांनी आतापर्यंत चार बळी घेतले आहेत. सध्या पावसाची रिमझिम सुरू असल्यामुळे दोन्ही बाजूंच्या उपमार्गावर खड्डे दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. नेमका रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता हे कळेना, अशी अवस्था मलकापुरात झाली आहे. वेळोवेळी हे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित यंत्रणा तोकडी पडत असे. या खड्ड्यांतून मार्ग काढत असताना अवजड वाहतुकीसह दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत असे. खड्ड्यांमध्ये वाहने आढळून अनेकांना मणक्याचा त्रास सुरू झाला. तर वाहनांचा मेंटेनन्सही वाढला असल्याचे वाहनधारकांमधून बोलले जात आहे. तरी हे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
खड्ड्यांत पाणी.. मणक्याला दणका!नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे उपमार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाची पाणी साचत आहे. वाहनधारकांना त्याचा अंदाज न आल्याने अपघात होऊन अनेकजण जायबंदी होत आहेत. अनेकवेळा सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने गाड्या बंद पडून गाड्यांचे नुकसान झाले आहे. दररोजच वाहतूक संथगतीने सुरू असते. तर वाहतूक कोंडी होऊन अनेकवेळा चार किलोमीटरपर्यंत रांगांमध्ये वाहनधारकांना अडकून पडावे लागत आहे.
जागोजागची अपुरी कामे जीवघेणी..मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराकडून ठिकाणी वेगवेगळी कामे सुरू आहेत. त्या कामात ठिकठिकाणी अपुरे कामे करून तसेच सोडून दुसरीकडेच काम सुरू केले जाते. त्यामुळे अशी अपुरी सोडलेली कामे वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहेत.