सातारा : ‘खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. तो मी माघारी घेतो,’ असे म्हणून ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सत्यमनगर माहुली, ता. सातारा येथे १ एप्रिल रोजी घडली.अब्दुल इमाम सय्यद, आफताब सलीम शेख, अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रंजना विनायक माने (वय ४५, रा. सत्यमनगर माहुली, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित दोघे आरडाओरड करत माने यांच्या घरासमोर आले. ‘तुझ्या पतीवर मी पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला आहे. तो मी माघारी घेतो. त्यासाठी मला ५० लाख रुपये दे,’ अशी मागणी केली. त्यावेळी पती विनायक माने हे घराबाहेर गेले असता ‘तुला पैसे का देऊ,’ असे त्यांनी विचारताच संशयितांनी शिवीगाळ करत माने यांच्या गळ्यातील दोन लाखांची चेन काढून घेतली. तसेच घरासमोर पार्क केलेल्या दोन कारवर कोयता मारून १० लाखांचे नुकसान केले. गाडीत ठेवलेली २० हजारांची रोकड लांबविली, असे रंजना माने यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल जायपात्रे हे करीत आहेत.
खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी ५० लाखांची मागितली खंडणी, साताऱ्यात दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:26 IST