सातारा : किल्ले अजिंक्यतारा हा कायम अजिंक्य, अभेद्य असा राहिला आहे. या किल्याची आजही इतिहासप्रेमी गडप्रेमींना भुरळ असते. शनिवारी नागपूर येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी किल्ले अजिंक्यताऱ्याला भेट दिली. नागपूर येथे दिवाळीनिमित्त किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याची स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. या निमित्ताने शिव गौरव या प्रतिष्ठानच्या वतीने यंदा स्वराज्याच्या चौथ्या राजधानीचा मान मिळविणाऱ्या किल्ले अजिंक्यताऱ्याची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी दिली.नागपूर येथील शिवदुर्ग प्रतिष्ठान गेली पंधरा वर्ष दिवाळीनिमित्ताने घेण्यात येणाऱ्या गडकिल्ले प्रतिकृती तयार करण्याच्या स्पर्धेत सहभागी होत आहे. या स्पर्धेत त्यांनी रायगड, तोरणा, राजगड, जंजिरा अशा अनेक किल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. यावर्षी प्रथमच ते किल्ले अजिंक्यतारा या किल्याची प्रतिकृती साकारणार आहेत. शिवदुर्ग प्रतिष्ठानचे रोहित लाड, पीयूष भराटे, संजय नांदुरकर, अमय महाडिक, आदित्य खंडागळे, नितीन येरंडे यांनी किल्ले अजिंक्यताराची शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांचे स्वागत उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केले. यावेळी जिज्ञासा मंचचे निलेश पंडित उपस्थित होते. होते. गडावरचा मुख्य दरवाजा, दक्षिण दरवाजा, गडावरील कोठार, राजसदर, महादेव मंदिर, मंगळाई मंदिर, कैद खाना याची सविस्तर माहिती त्यांना प्रत्यक्ष गडावर देण्यात आली. तसेच निलेश पंडित यांनी गडाच्या इतिहास कालीन नावाचे रहस्य विशद केले.
नागपूरमध्ये साकारणार किल्ले 'अजिंक्यतारा'ची प्रतिकृती
By सचिन काकडे | Published: October 07, 2023 6:43 PM