सातारा: कोरेगाव तालुक्यातील हिवरे येथील शाळकरी मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शनिवार, दि. २३ रोजी सायंकाळी चारनंतर उघडकीस आली. अज्ञाताने खून केल्यानंतर मृतदेह उसाच्या फडात टाकला. विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ (वय १२) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
वाठार पोलिस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी की, हिवरे येथील कुंभारकी नावाच्या शिवारात शनिवारी विक्रम व त्याचे आई-वडील जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. सायंकाळी चारच्या दरम्यान विक्रमची आई घरी गेली. विक्रम व त्याचे वडील पाठीमागून एक तासानंतर घराकडे येत असताना चप्पल शेतात राहिल्याचे विक्रमच्या लक्षात आले. तो वडिलांना सांगून चप्पल आणण्यासाठी पुन्हा शेतात गेला. दरम्यान, मुलगा बराच वेळ घरी न आल्याने त्याच्या आईने त्याची गावात शोधाशोध सुरू केली. परंतु तो सापडला नाही. सायंकाळी सात वाजता गावातील नितीन खताळ यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे फोन करून गावातील लोकांना विक्रम बेपत्ता असल्याचे सांगितले. यामुळे गावातील सर्व ग्रामस्थ व युवक एकत्र जमले. परिसरात बिबट्याची दहशत असल्याने त्या अनुषंगाने जमलेल्या लोकांनी कवडेवाडी शिवार व कुंभारकी शिवारात त्याचा शोध घेतला. तरीही त्याचा शोध लागला नाही. त्यानंतर काही युवकांनी त्यांच्या कुंभारकी येथील उसाच्या शेतात प्रत्येक सरीत शिरून त्याचा शोध घेतला असता एका सरीत उसाच्या पाचोट्याने झाकून ठेवलेला विक्रम याचा मृतदेह निदर्शनास आला. त्यानंतर याची माहिती वाठार पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, तपास यंत्रणा, कोरेगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शेळके घटनास्थळी दाखल झाले. विक्रम याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या गळ्याभोवती दोरीने आवळल्याचे व्रण दिसून आले. याबाबत वडील विजय आनंदराव खताळ यांनी वाठार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाठार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले हे अधिक तपास करीत आहेत.
खुनी माहीतगारच...विक्रम खताळ याचा खून करणारी व्यक्ती ही माहीतगार असावी. बाहेरहून कोणी त्या ठिकाणी येऊन त्याचा खून केला नसावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकरच या खुनाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.