सातारा : राज्य सरकारने सादर केलेल्या पुरवणी अर्थसंकल्प महिला, शेतकरी, युवक, दुर्बल घटकाला समर्पित असून जिल्ह्यातील पर्यटन विकासाला पाठबळ, महिला आणि तरुणींना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये देणारी ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेमुळे महिलांना आर्थिक पाठबळ लाभत आहे. या योजनांचा लाभ सर्व तळागाळातील लोकांना मिळावा, यासाठी भाजपच्या वतीने बुथनिहाय स्वतंत्र यंत्रणा उभारणार आहे. यामध्यमातून योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उत्पन्नाचा दाखला, डोमीसाइल आदी कागदपत्रे मिळवण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले आहे.सातारा येथे विश्रामागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष विकास गोसावी, सुनीशा शहा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. कदम म्हणाले, महिलांचे आरोग्य व पर्यावरण संवर्धन हे दोन्ही साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. वर्षाला घरटी तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप आणि अखंडित वीजपुरवठ्याची हमी देणाऱ्या सरकारच्या या योजनेमुळे तसेच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेमुळे समस्याग्रस्त शेतकऱ्यास मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील ४४ लाख सहा हजार शेतकऱ्यांना या योजनेमुळे साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज पुरविली जाणार असल्याने आणि शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करण्याच्या निर्णयामुळे हवामान बदलामुळे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात मिळाला असल्याचे कदम यांनी सांगितले.सातारा जिल्ह्यासाठी भरीव निधीकदम म्हणाले युवक, सातारा जिल्ह्याचा विचार करता नवीन महाबळेश्वर प्रकल्प पर्यटन विकास यासाठी ३८१ कोटींचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. सातारा तालुक्यातील ३२ आणि पाटण तालुक्यातील ५६ गावांचा समावेश असेल. कराड येथील गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजला सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा देण्यात असून कोयना, हेळवाक जल पर्यटनास मान्यता दिली असून भरीव निधीची तरतूद केली जाईल. गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांच्या वेतनश्रेणीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. नगरपालिकेचे फायरफायटर आणि तत्सम यंत्रणांच्या बळकटीकरण आणि नूतनीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, असेही भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी स्पष्ट केले.
लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार - धैर्यशील कदम
By दीपक देशमुख | Published: July 02, 2024 3:32 PM