प्रगती जाधव पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: अमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील अॅड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अॅड. मनिषा आढाव या दाम्पत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या गंभीर घटनेच्या निषेधार्थ पीडीत आढाव कुटूंबीयांना शासनाच्यावतीने आर्थीक मदत मिळावी, वकील संरक्षण कायदा करण्यात यावा, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी आदी मागण्यांसाठी कोल्हापुर येथील अॅड. अभिजीत खोत यांनी उपोषणाची श्रृंखला सुरू केली आहे. याअंतर्गत बुधवारी त्यांनी सातारा येथे लाक्षणिक उपोषण केले.
ज्या प्रमाणे वकिलांना कंटेम्ट ऑफ कोर्ट अॅक्ट १९७१ नुसार शिक्षा केली जाते त्याचप्रमाणे न्यायाधीशांनी जर चुकीचे जजमेंट, आदेश, हुकूमनामा केल्यामुळे जर एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा झाली किंवा दिवाणी दाव्यात आर्थीक नुकसान झाले व मानसिक त्रास झाल्यास त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस न्याधीशांनाही जबाबदार धरून त्यांच्याविरूध्द पॅनेल अॅक्शन, डिसिप्लिनरी अॅक्शन, पिक्युनरी अॅक्शन घेण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडिया तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांनी पुढाकार घेऊन केंद्र शासनाकडून जज्जेस अकांटेबिलिटी अॅक्ट पारित करून घ्यावा, अशीही आग्रही मागणी त्यांनी केली आहे. याबरोबरच सर्व ज्युनिअर वकिलांना उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी प्रति महिना वीस हजार रूपये स्टायपेंड मिळावा, वेलफेअर फंडातून प्रत्येकी पंधरा लाख रूपये मिळावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.