मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने निघालेल्या कारच्या आडवी रिक्षा आल्यामुळे भरधाव कारची रिक्षाला धडक बसली. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी असे गंभीर जखमी झाले. हा अपघात येथील एका मंगल कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी पावणेएकच्यासुमारास झाला. रिक्षा पलटी झाल्यामुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.सखूबाई किसन कांबळे (वय ७०, मूळ रा. काले, सध्या रा. मलकापूर, ता. कऱ्हाड), विश्वनाथ रामचंद्र कुंभार (३०, रा. अष्टविनायक कॉलनी, मलकापूर) व शब्बीर रशिद बागवान (५०, रा. खराडे कॉलनी, कऱ्हाड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातस्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार (एमएच १७ एझेड १३३४) चा चालक कोल्हापूरकडून पुण्याच्या दिशेने जात होता.पुणे-बंगळूर महामार्गावर येथील मंगल कार्यालयासमोर आला असता चार प्रवासी घेऊन कऱ्हाडच्या दिशेने निघालेली रिक्षा (एमएच ११ वाय ७५२३) ही येथील उपमार्गावरून अचानक कारच्या आडवी आली. त्यामुळे भरधाव कारची रिक्षाला धडक झाली. यावेळी झालेल्या धडकेत रिक्षा पलटी होत फरफटत गेली. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी वयोवृध्द महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाचा उजवा हात व पाय मोडल्याने गंभीर दुखापत झाली आहे.अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक व युवक अपघातस्थळी धावले. युवकांनी जखमींना त्याच कारमधून उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, रमेश खुणे, जितेंद्र भोसले व कराड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रशांत जाधव, धीरज चतूर यांच्यासह कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. देखभालच्या कर्मचाऱ्यांसह युवकांनी वाहने बाजूला केली. अपघाताची नोंद उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती.
Accident: रिक्षा आडवी आल्याने भरधाव कारची रिक्षाला धडक, तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 7:07 PM