कऱ्हाड : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गलगत पाटण तालुक्यातील विहे गावच्या हद्दीत असलेल्या विहिरीत क्रुझर जिप कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. पाण्याने भरलेल्या या विहिरीत जीप कोसळताना काही प्रवाशांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विहे गावच्या हद्दीत गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गापासून शंभर फुटावर विहीर आहे. या विहिरीला सुरक्षा कठडे नाहीत. मंगळवारी सायंकाळी कराडहुन पाटणच्या दिशेने निघालेली एक भरधाव जीप महामार्गावरून थेट त्या विहिरीत कोसळल्याचे काही प्रवाशांनी पाहिले. याबाबतची माहिती परिसरातील ग्रामस्थांना तसेच पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले.
संततधार पावसामुळे बचावकार्यात पोलिसांना अडथळे येत आहेत. विहिरीत कोसळलेली जीप नेमकी कोणती आणि त्यामध्ये किती प्रवासी आहेत, याचा कसलाही अंदाज पोलिसांना आलेला नाही. रात्री उशिरापर्यंत विहिरीतील पाणी पंपाद्वारे बाहेर काढण्याचे काम सुरू होते. तसेच घटनास्थळी पोलिसांनी जेसीबी मागून घेतला आहे. विहिरीतील पाणी कमी झाल्यानंतर जीप विहिरीतून बाहेर काढली जाणार असून नेमकी घटना समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. विहिरीत कोसळलेल्या जीपमध्ये किती प्रवासी आहेत. याबाबतचा तपशील अद्यापही समोर आलेला नाही.