सातारा : ऊसतोड मजूर महिलांच्या हालआपेष्टांच्या अनेक घटना समोर येत असून, अशीच एक घटना कऱ्हाड परिसरात गुरुवारी सकाळी समोर आली. गरोदर असलेल्या ऊसतोड मजूर महिलेला धावत्या ट्रॅक्टरमध्येच प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. ही बाब १०८ रुग्णवाहिकेला मिळाल्यानंतर रुग्णवाहिकेतील महिला डाॅक्टर व परिचारिकांनी तातडीने तेथे जाऊन बाळ व मातेचा जीव वाचविला.लक्ष्मी गणेश एकावडे (वय ३०, रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) ही महिला ऊसतोड मजूर आहे. ही महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. पती गणेश एकावडेसह ती कऱ्हाडला दवाखान्यात तपासणीसाठी निघाली होती. वाटेत ट्रॅक्टर दिसल्याने त्यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून कऱ्हाडला जाण्याचा निर्णय घेतला. कऱ्हाड अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असतानाच धावत्या ट्रॅक्टरमध्येच त्या महिलेला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. वेदनेमुळे ती महिला व्याकूळ झाली. ट्रॅक्टर चालक प्रमोद जाधव यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर १०८ रुग्ण वाहिकेचे समन्वयक राजेंद्र कदम यांनी तातडीने कऱ्हाड येथे रुग्णवाहिका पाठविली. रुग्णवाहिकेतील महिला डाॅक्टर दीपाली पाटील यांनी तातडीने महिलेला ट्रॅक्टरमधून खाली घेतले. तोपर्यंत महिलेची नैसर्गिक प्रसूती होत आली होती. डाॅ. पाटील यांनी ट्रॅक्टरचा आडोसा करून अत्यंत सुरक्षित त्या महिलेची प्रसूती केली. त्यानंतर बाळ आणि मातेला सुखरूपपणे रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
ऊसतोड मजूर महिलेची ट्रॅक्टरमध्येच प्रसूती, साताऱ्यातील कऱ्हाडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 11:51 AM