अजय जाधव
उंब्रज: बँक ऑफ महाराष्ट्रच्या कंट्रोल रुमच्या कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे व त्यांनी तात्काळ उंब्रज पोलीस ठाण्याला संपर्क साधल्यामुळे उंब्रज येथील एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पोलीस गाडीचा सायरन वाजताच दोघा चोरट्यांनी घटनास्थळावरुन पलायन केले.याबाबत माहिती अशी की, आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास मास्क घातलेल्या दोन चोरट्यांनी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम कटावणीने फोडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. हे कंट्रोल रुममधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानी तात्काळ उंब्रज पोलिसांशी संपर्क केला.दरम्यान, उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. पोलीस ठाण्यातून या घटनेची माहिती मिळताच हे पथक घटनास्थळी रवाना झाले. सायरनचा आवाज येताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पळून गेले. या घटनेनंतर अज्ञात चोरटयांविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.